आज एकाला काढून टाकल

तो रोज हसायचा
काम असताना एकाच जागी दहा दहा तास बसायचा
चहा कॉफी नाश्तासुद्धा घरीच आवरायचा
ज्युनियर्स ना साथ देत त्यांना सावरायचा

आज तो हसत नव्हता, जणू त्याच आभाळ फाटल
कंपनीला तो नको होता, आज त्याला काढून टाकल

कित्येकांचे अकाउंट्स त्यानेच बनवलेले
अगदी कंपनीतील पहिले आयकार्ड त्यानेच पटकवलेले
मी इथच निवृत्त होणार असं तो म्हणायचा
कंपनीबाबत भालेबुरे अफवांत गणायचा

आज त्याचच अकाउंट कंपनीने बंद करुन टाकल
कंपनीला तो नको होता, आज त्याला काढून टाकल

सगळ्यांचे बर्थडे केक तोच मागवायचा
सगळ्या ऑफसाइटस रात्रभर तोच जागवायचा
त्याच्या मिसेस ला पाहिलं होत 'फॅमिली डे' असताना
दोन चिमुकल्या पोरीही आठवतात कॉल्स मध्ये दिसताना

आत्ता त्यांच पुढे कसं होणार या विचाराने धस्स वाटलं
कंपनीला तो नको होता, आज त्याला काढून टाकल

आता तो घरी गेला असेल
दोन पिल्लांकडे बघत बसला असेल
पुढचा EMI कसा भरणार
विचार करत असेल

त्याच्या एकाच्या जिवावर कंपनीने करोडो छापलं
पण आज कंपनीला तो नको होता, म्हणून त्याला काढून टाकल




कवी: आत्माराम नाईक

All rights reserved.